मूल्यांचा सन्मान
मा. प्रतापराव पवार सर त्यांच्या उद्योग– व्यवसायाबरोबरच विद्यार्थी साहाय्यक समिती, बालकल्याण संस्था, सकाळ रिलीफ फंड, सकाळ इंडिया फाउंडेशन, महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वरुपवर्धिनी, अंधशाळा, अँग्रीकल्चरल ट्रस्ट बारामती अशा अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यात अगदी तरुण वयापासून सक्रिय आहेत. जवळपास ४०– ५० वर्षे या सर्व संस्थांशी एकरुप होऊन त्यांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि कालसुसंगत सुधारणेसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. याविषयी कृतज्ञता म्हणून सर्व संस्थांच्या वतीने त्यांचा सामाजिक कृतज्ञता सोहळा आयोजिला आहे.
असे सोहळे किंवा सन्मान ही खरे तर सरांना न आव़डणारी गोष्ट. या कार्यक्रमासाठीही त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी नकारच दिला होता. उलट ‘या सर्व संस्थांच्या संस्थापकांनी ज्या ध्येयाने, निष्ठेने काम केले, त्यांनी कुठे सत्कार स्वीकारले,’ अशी विचारणा करून, ‘ज्यावेळी त्यांनी माझ्याकडे कामाची जबाबादारी दिली त्यावेळी त्यांचा त्याग बघून मी निमूटपणे त्यात सहभागी झालो. त्या सर्वांपुढे माझे काम खूप छोटे आहे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. हे समजून घेतले तरी प्रतापराव सरांनी आयुष्यभर जी मूल्ये जपली, संस्थांमध्ये एक संस्कृती निर्माण केली, ती समाजापुढे येणे गरजेचे आहे, असा आम्ही हट्ट धरून त्यांना या कार्यक्रमासाठी तयार केले. त्यामुळे हा केवळ व्यक्तीचा नाही, तर मूल्यांचा सन्मान आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
प्रतापराव केवळ व्यक्ती नाहीत तर संस्था आहेत, असे आम्ही सर्व मानतो. एका आयुष्यात किती जबाबदाऱ्या आणि त्याही समर्थपणे पार पाडता येतात, हे त्यांच्याकडे पाहून लक्षात येते. वेळेबाबतचा काटेकोरपणा, गुणग्राहकता, संवेदनशीलता, निर्णयातील स्पष्टता, नाविन्याचा ध्यास, आपण जे पाहिले, अनुभवले ते पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्याची मनीषा, अशी त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांच्या परीसस्पर्शाने आजवर हजारो व्यक्तींना, विद्यार्थ्यांना नक्की फायदा झाला असेल.
तरुण पिढी उद्योजकतेकडे वळली पाहिजे म्हणून त्यांच्या मार्गदर्शनातून समितीत सुरू झालेले उपक्रम, एखाद्या विद्यार्थ्याने नवे काही केले की, ते समजून घेऊन त्याला कशी मदत करता येईल, यासाठीचे त्यांचे प्रयत्न, कोण कुठे भेटले आणि समितीशी संबंधित विषय वाटला की त्याला जोडण्यासाठीचे प्रयत्न, दरवर्षी संस्थेसाठी आर्थिक योगदान देतानाच यावर्षी संस्थेच्या भविष्याचा विचार करून दिलेली मोठी मदत या साऱ्यांतून त्यांचे श्रेष्ठत्व लक्षात येते. आपण समाजाचे देणे लागतो ही त्यांची जाणीव सतत जागृत असते. सरांकडून अजून अशीच अनेक समाजोपयोगी कामे व्हावीत आणि त्यासाठी त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभावे, ही प्रार्थना.
- चंद्रकांत कुलकर्णी, मुख्य विकास अधिकारी, विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे